वृत्त संस्था/ चेन्नाई
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या घटना विभागाच्या अधिकाऱयांकडून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांची कन्या रूपा गुरूनाथ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्यावर्षी तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रूपा गुरूनाथनची निवड झाली होती.
मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे मानद सदस्य संजीव गुप्ता यांनी रूपा गुरूनाथ यांच्या विरोधात तक्रार बीसीसीआयकडे नोंदविली होती. या तक्रारीमुळे बीसीसीआयचे घटना विभागाचे अधिकारी तसेच निवृत्त न्यायाधीश डी.के. जैन यांनी तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षा रूपा गुरूनाथ यांना नोटीस पाठविली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी बीसीसीआयने रूपा गुरूनाथ यांना 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.