मे महिन्यापर्यंत स्वदेशी किट अपेक्षित : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
कोरोना विषाणूचा संसर्ग देशात वाढत असला तरी भक्कम वैद्यकीय सुविधांमुळे भारत या रोगाशी समर्थपणे झुंज देत आहे. प्रत्यक्ष उपचार आणि संशोधनाच्या पातळीवरही भारताची वाटचाल सकारात्मक दिशेने सुरू आहे. आता जैव विभाग (डीबीटी) आणि अन्य सहकारी स्वायत्त संस्थांमार्फत योग्य उपचारपद्धतीचा शोध सुरू आहे. तसेच स्वदेशी रॅपिड टेस्ट आणि आरटी-पीसीआर निदान किट विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या सर्व प्रयत्नांना पुढील म्हणजे मे महिन्यापर्यंत यश मिळणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी दिली.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी आरोग्यविषयक संस्थांमधील महत्त्वाच्या अधिकारी-शास्त्रज्ञांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या संवादाअंती काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच स्वदेशी रॅपिड टेस्ट आणि आरटी-पीसीआर निदान किट येत्या महिन्यापर्यंतच सज्ज करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या. त्यादृष्टीने संबंधितांनीही सकारात्मकता दर्शवली असून या दोन्ही किट देशातच तयार झाल्या कोरोनाविरोधी युद्धाशी दोन हात करण्यास गती मिळणार आहे. यापूर्वी भारताने पोलिओ निर्मूलन मोहिमेतही उत्तुंग भरारी घेत जगात आदर्शवत कामगिरी बजावली होती. अशीच कामगिरी आता कोरोनाविरोधी लढय़ातही भारत बजावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱया कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सद्यस्थितीत बीआयआरएसीच्या माध्यमातून 150 स्टार्टअप्स कंपन्यांना मदत केली जात असल्याच्या प्रयत्नांचे आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी बीआयबीसीओएलच्या सार्वजनिक उपक्रमान्वये बनविण्यात आलेल्या नव्या हॅन्डसॅनिटायझरचे अनावरणही डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. या सॅनिटायझरच्या विक्रीतून मिळणाऱया रकमेपैकी प्रतिबॉटल एक रुपयाची मदत पंतप्रधान मदत निधीला सुपूर्द केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.