प्रतिनिधी / कराड
गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी पोलिसांनी हद्दपारीच्या कारवायांची मोहीम सुरू ठेवली आहे. गुरूवारी रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना सातारा जिह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी दिली. अमित हणमंत कदम (सध्या रा. वैभव कॉलनी, विद्यानगर. मुळ रा. अंतवडी ता. कराड), शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी (रा. हजारमाची ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरासह तालुक्यातील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षभरात हद्दपारीच्या कारवाईची मोहीम वेगाने सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी गुन्हेगारी टोळ्यांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी पाठवण्याचे प्रयत्न केले. अमित कदम व शेखर सूर्यवंशी यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. 6 एप्रिल 2021 रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर संबधितांना तत्काळ हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यांना सातारा जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
दोन टोळ्या, 26 गुन्हेगार हद्दपार
शहर व तालुक्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपारीच्या कारवाईला सुरूवात केली. आत्तापर्यंत पोलिसांनी दोन गुन्हेगारी टोळ्यांसह 26 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. तर काहींना कारागृहात स्थानबद्ध केले आहे. आणखी काही गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत.