नवी दिल्ली : चिनी कंपनी शाओमीचा नवा रेडमी 9 ए हा मोबाइल स्मार्टफोन नुकताच भारतात दाखल झाला आहे. 5 हजार एमएएचची दमदार बॅटरी असणाऱया फोनची किंमत 6 हजार 799 रुपयांपासून पुढे असणार आहे. या आधी कंपनीने 9 सिरीजमधील रेडमी 9 व रेडमी 9प्राइम हे फोन दाखल केले होते. आता पुढच्या टप्यातील 9 ए हा फोन कंपनीने सादर केला आहे. सुरूवातीला हा फोन मिडनाइट ब्लॅक, नेचर ग्रीन आणि सी ब्लू या तीन रंगात उपलब्ध होणार आहे. वॉटरड्रॉप स्टाइल नॉचने युक्त हा फोन 6.53 इंच एचडी डिस्प्लेचा असेल. या फोनला सिंगल लेन्स रिअर कॅमेरा असून 13 मेगापिक्सलचा तो असेल. 5 हजार एमएएच बॅटरीसह येणारा हा फोन वेगाने चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. 2 जीबी आणि 32 जीबीच्या फोनकरीता ग्राहकांना 6 हजार 799 रुपये मोजावे लागतील तर 3 जीबी आणि 32 जीबीच्या फोनकरीता 7 हजार 499 रुपये मोजावे लागणार आहेत.
पियाजियोची नवी स्कुटर दाखल
मुंबई : रेसिंग सिक्स्टीज प्रकारातील व्हेस्पा एसएक्सइल ही नवी दुचाकी नुकतीच बाजारात दाखल केली आहे. या गाडीची किंमत अंदाजे 1 लाख 19 हजार रुपये इतकी असणार आहे. 1960 च्या धर्तीवर कंपनीने आपली नवी गाडी सादर केली आहे. 125 सीसी आणि 150 सीसी प्रकारात ही गाडी उपलब्ध केली जाणार असून यांची अनुक्रमे किंमत 1.19 लाख, 1.32 लाख रुपये इतकी असणार आहे. या स्कुटरला अनेक वैशिष्टय़े जोडली गेली आहेत. स्कुटरची स्टाइल हटके असल्याचे कंपनीने सांगितले. एलइडी लाइटिंग, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डीआरएल, बुट लाइट व युएसबी मोबाइल चार्जिंगची सुविधा या गाडीत असेल.
ऑगस्टमध्ये सोने आयात वाढली
मुंबई : गेल्या ऑगस्टमध्ये सोने आयातीमध्ये दुप्पट इतकी वाढ झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ दिसून आली असून गेल्या आठ महिन्यात सोने आयातीने चांगली प्रगती केली असल्याचे दिसून आले आहे. अनलॉकमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेचा लाभ उठवत सराफांनी आपल्या व्यवसायावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत केले. गेल्या ऑगस्टमध्ये भारतात 60 टन इतके सोने आयात करण्यात आले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात 32 टन इतके सोने आयात करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये 3.7 अब्ज डॉलर्सचे सोने भारताने आयात केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.