प्रतिनिधी/ बेळगाव
‘कंटेन्मेट’ परिसर म्हणून घोषित करण्यात आलेला परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात रुग्ण आढळत असल्याने ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेला परिसर सील करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शनिवारी तांबीट गल्ली आणि रविवारी टिळकवाडी परिसरातील गवळी परिसरात बॅरिकेड्स लावून सील करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रसार वाढत चालल्याने महापालिका प्रशासनाने शहराचा सर्वेक्षण करून विविध गल्ल्यांचा समावेश ‘रेड झोन’मध्ये करण्यात आला आहे. शहरातील विविध भागाचा समावेश करून अकरा झोन घोषित करण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेंट परिसरात रुग्ण आढळल्याने हा परिसर कंटेन्मेंट म्हणून घोषित करून तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. पण शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने काही भागाचे सर्वेक्षण करून रेड म्हणून घोषित केले होते. पण मागील काही दिवसात महापालिका व्याप्तीमध्ये येणाऱया बॉक्साईट रोड येथील अस्मा कॉलनी, अमननगर आझाद गल्ली आदी परिसरात आणखी तीन रुग्ण आढळल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेण्याबरोबर हा परिसर सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा आणि आरोग्य खात्याच्यावतीने रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक घरात जावून माहिती घेण्यात येत आहे. शनिवारी तांबीट गल्ली परिसरात ही मोहीम राबवून हा परिसर सील करण्यात आला. रविवारी टिळकवाडी परिसरातील गवळी गल्ली, कसाई गल्ली, खंजर गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली. शहरात कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. रेड झोनमधील परिसर टप्प्याटप्प्याने सील करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांकडून उपलब्ध झाली आहे.