हुबळी येथील वर्कशॉपमध्ये कर्मचाऱयांकडून उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशातील रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी बसून न राहता सॅनिटायझर व मास्कची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. हुबळी येथील वर्कशॉपमध्ये रेल्वे कर्मचाऱयांकडून हे काम करण्यात येत आहे. तयार केलेले साहित्य सरकारी कर्मचाऱयांसाठी वापरले जात आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने आपल्या वर्कशॉपमध्ये सॅनिटायझर बनविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱयांना काम मिळाले असून त्यांची इतरांना मदत होत आहे. सध्या सॅनिटायझरचे दर वाढल्याने रेल्वेने स्वत:च तयार करण्यास सुरुवात केली आहे. इतर महिला कर्मचाऱयांकडून मास्क बनविले जात आहेत. ज्या शेडमध्ये रेल्वेच्या डब्यांची दुरुस्ती होते तेथे आता मास्क व सॅनिटायझर बनविले जात आहेत.
रेल्वेस्थानकांची स्वच्छता
रेल्वे नसल्याने स्थानके बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांकडून स्थानकांची स्वच्छता करण्यात येत आहे. बेळगावबरोबरच हुबळी, लोंढा, वास्को या स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. काही ठिकाणी दुरुस्तीही करण्यात येत आहे.