प्रतिनिधी/ बेळगाव
प्रवासाचा वेळ कमी करून रेल्वेची गती वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशातील महत्वाच्या मार्गांचे दुपदरीकरण केले जात आहे. लोंढा ते मिरज दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात असून, मार्च 2023 पर्यंत मिरज ते बेंगळूर या संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण होईल, असा विश्वास नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी व्यक्त केला.
एकच रेल्वेमार्ग असल्यास क्रॉसिंगसाठी रेल्वेला बराच वेळ थांबावे लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याने भारतीय रेल्वेने दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या मार्गांवर प्रवासी वाहतूक सर्वाधिक आहे, अशा रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण केले जात आहे.
मिरज ते लेंढा या दरम्यानच्या दुपदरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे. एकूण 186 कि. मी. लांबीच्या लोंढा- मिरज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण डिसेंबर 2019 पासून सुरू झाले. पहिल्या टप्प्यात चिकोडी ते घटप्रभा या 16 कि. मी. रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात चिकोडी ते रायबाग व रायबाग ते कुडची हा मार्ग पूर्ण झाला. त्यानंतर बेळगाव ते देसूर व देसूर ते खानापुर तसेच सुलधाळ ते घटप्रभा व कुडची ते मिरज या मार्गांचेही दुपदरीकरण पूर्ण करण्यात आले. सध्या लोंढा ते खानापूर या दरम्यानचे काम प्रगतीपथावर आहे.
लोंढा ते मिरज व हुबळी ते चिकजाजूर या दोन टप्प्यातील दुपदरीकरणाचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाल्यास मिरज ते बेंगळूर या दरम्यान कुठेही क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबणार नाही. यामुळे प्रवासाचा कालावधी तासाभराने कमी होणार आहे. याचबरोबर विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत इंजिनवर धावणाऱ्या एक्स्प्रेसदेखील या मार्गावर धावण्यासाठी सज्ज होणार आहेत.
रेल्वेमार्ग दुरुस्तीस्तव काही गाड्या रद्द
मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने दि. 12 ते 21 जानेवारी दरम्यान मिरज-कॅसलरॉक अनारक्षित एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. लोंढा ते बेळगाव व सुळेभावी ते सुलधाळ या दरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मिरज-कॅसलरॉक व कॅसलरॉक-मिरज या अनारक्षित एक्स्प्रेस दि. 12 ते 21 दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
याचबरोबर देवरगु• ते हावेरी या दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येत असल्याने बेळगाव-म्हैसूर विश्वकर्मा एक्स्प्रेस दि. 10 व 11 रोजी बेळगाव ते बिरूर दरम्यान रद्द करण्यात आली असून, बिरूर ते म्हैसूर दरम्यान धावणार आहे. म्हैसूर-बेळगाव एक्स्प्रेस 10 व 11 रोजी बिरूर ते बेळगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे. कोल्लम-बेळगाव एक्स्प्रेस 9 रोजी दावणगेरी, अमरावती, होस्पेट यामार्गे वळविण्यात आली असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने कळविले आहे.