प्रतिनिधी /फोंडा :
बॉलिवूड अभिनेते कपिल झवेरी व शैलेश शेट्टी यांचा ड्रग्स पार्टीतील सहभाग उघड झाल्याने त्यांच्या विरोधात कारवाई झालेली आहे. विरोधकांनी या मुद्यावर फाजिल प्रचार करून भाजपा नेत्याविरोधात जनतेची दिशाभूल करू नये. सरकार अशा गुन्हय़ाबाबत गंभीर असल्यानेच सीआयडी पथकामार्फत हणजुण येथील या रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली. या मुद्दय़ावर राजकीय भांडवल करु नये, अशी टिका फोंडा भाजपा मंडळाने केली आहे.
फोंडा भाजपाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, विरोधकांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपाच्या अन्य नेत्यांसोबत कपिल झवेरी यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले, याचा अर्थ भाजपा नेत्यांचा या लोकांशी संबंध आहे, हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य नेत्यांना कुठल्याही कारणासाठी कुणीही भेटू शकतात. तसे असल्यास अभिनेते कपिल झवेरी यांचा संपर्क माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, तसेच शैलेश शेट्टी यांचा गोवा फोरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांच्याशी यापूर्वी आलेला आहे. तसे फोटोही उपलब्ध आहेत. त्यामुळे या नेत्यांचाही झवेरीसोबत संबंध जोडायचा का? असा प्रश्न कोलवेकर यांनी उपस्थित केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी सुनील देसाई, उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक व्यंकटेश नाईक, संदीप खांडेपारकर, पुरुषोत्तम नाईक हे उपस्थित होते.
सुनील देसाई म्हणाले, सध्या कोरोनाचे सावट असताना अशा प्रकारच्या पाटर्य़ा आयोजित करणे हा गुन्हाच आहे. पोलिसांनी जी कारवाई केली त्याबद्दल सरकार व पोलिसांचे अभिनंदन करावे लागेल. किनारी भागात चाललेल्या अशा रेव्ह पाटर्य़ांना अजिबात थारा देऊ नये. सरकारने त्यात गुंतलेल्यांची पाळेमुळे खोदून काढावी, अशी मागणी फोंडा भाजपातर्फे मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.