क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात एटीके मोहन बागानने आपल्या दहाव्या विजयाची नोंद केली. काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात त्यानी बेंगलोर एफसीचा 2-0 गोलानी पराभव केला. बेंगलोरला सहावा पराभव स्वीकारावा लागला.
कालच्या सामन्यातील दोन्ही गोल पहिल्या सत्रात झाले. हे गोल रॉय कृष्णा आणि मार्सेलिनो परेरा यांनी केले. विजयाच्या तीन गुणानी एटीके मोहन बागानचे आता 16 सामन्यांतून 10 विजय, 3 बरोबरी आणि 3 पराभवाने 33 गुण झाले आहेत. पराभूत बेंगलोर एफसीचे आता 17 सामन्यांतून 4 विजय, 7 बरोबरी आणि 6 पराभवाने 19 गुण झाले असून ते आता सहाव्या स्थानावर आहेत.
आयएसएलच्या लीग जेतेपदासाठी आता मुंबई सिटी आणि एटीके मोहन बागान यांच्यात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. मुंबई सिटी एफसीचे 16 सामन्यांतून 34, एटीके मोहन बागानचे 33 तर एफसी गोवा, हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेडचे 23 गुण झाले आहेत. मुंबई सिटी आणि एटीके मोहन बागान यांच्यातील अंतर आता केवळ एका गुणाचे राहिले आहे.
बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगने काल अभेद्य गोलरक्षण करून संघावर होणारे कित्येक गोल वाचविल्याने एटीके मोहन बागानची गोलसंख्या केवळ दोनपुरतीच मर्यादित राहिली. सामन्याच्या सातव्याच मिनिटाला ब्राझिलीयन मार्सेलिनो परेराचा फटका गुरप्रीतने अडविला. बेंगलोरने दोन मिनिटानंतर प्रतिचाल रचली. यावेळी त्यांच्या उदांता सिंगचा भेदक क्रॉस एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यने अडविला. सामन्याच्या 18व्या मिनिटाला रॉय कृष्णाची गोल करण्याची चाल गुरप्रीतने उधळून आल्यानंतर बेंगलोर एफसीच्या राहुल भेकेच्या पासवर सुरेश वांगझामने दिशाहीन फटका हाणला आणि गोल करण्याची सोपी संधी गमवली. लगेच एटीके मोहन बागानच्या कार्ल मॅकहय़ुजचा फटका गुरप्रीतने आपल्या उजव्या बाजूने झेपावत अडविल्यानंतर 37व्या मिनिटाला एटीकेने पेनल्टीवर गोल करून आघाडी घेतली. बेंगलोरचा डिफेंडर प्रतीक चौधरीने बॉक्समध्ये रॉय कृष्णाला पाडल्याबद्दल रेफ्रीने दिलेल्या पेनल्टीवर रॉयनेच गोल करून आघाडी घेतली.
मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना एटीके मोहन बागानने दुसरा गोल केला. त्याने घेतलेली फ्रिकीक बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगला भेदून गेली. दुसऱया सत्रात आरंभालाच गुरप्रीत सिंगने संदेश झिंगनचा गोल करण्याचा यत्न उधळून लावला. मागील सामन्यात दोन गोल केलेल्या मानवीर सिंगचाही गोल करण्याचा यत्न गुरप्रीतने अडविला. सामन्याच्या शेवटच्या क्षणाला बेंगलोर एफसीला आपली पिछाडी कमी करण्याची संधी मिळाली होती. मात्र कप्तान सुनील छेत्रीने अगदी जवळून हाणलेली शूट एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यन तत्परतेने अडविली.