वार्ताहर / उचगाव
उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोज किमान 200 कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, आरोग्य खाते व लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.
सदर आरोग्य केंद्र कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर असल्याने महाराष्ट्रामधून अनेक नागरिकांची या भागात ये-जा असते. देवरवाडी, महिपाळगड, सुंडी, शिनोळी या भागातून बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, कोनेवाडी, कल्लेहोळ आदी गावातून अनेक नागरिकांची सातत्याने
ये-जा सुरू असते. अनेक शेतकऱयांची शेतीही कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीत आहे. शेतीनिमित्त अनेक शेतकऱयांचा या गावातील नागरिकांशी संपर्क येतो. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचा संसर्ग या सीमाभागात देखील होत आहे. यासाठी उचगाव आरोग्य केंद्र हे अतिशय महत्त्वाचे असून या केंद्रामध्ये याच भागातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी या भागातील जनतेची आहे.
या आरोग्य केंद्रासमोर रोज किमान दोनशे लोक लस घेण्यासाठी येत आहेत. मात्र, आठवडय़ातील एक-दोन दिवसच लस उपलब्ध असते. अन्य दिवशी लस नसल्यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. अनेक कामगार कामधंदे सोडून लस घेण्यासाठी या आरोग्य केंद्राकडे हेलपाटे मारत आहेत. यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.
जिल्हाधिकारी, आरोग्य खात्याने तातडीने सोमवार, शनिवार या दिवसांमध्ये किमान 200 कोरोना प्रतिबंधक लस या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक पहिली लस घेतली आहे आणि दुसऱया लसीच्या प्रतीक्षेत आहेत अशांनाही आरोग्य खात्याकडून मिळालेल्या मेसेजनुसार लस उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी होत आहे. लस नसल्याचे सांगताच अनेक जण डॉक्टरांवर संताप व्यक्त करत आहेत. तरी तातडीने लसची सोय करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.