शिबिरासाठी 20 लाखांहून अधिक खर्च : शिबिरार्थींना निःशुल्क सेवा : 21 मार्च रोजी आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी, शहरातील रोटरी परिवार, इनरव्हील क्लब व साधू वासवानी मिशन पुणे व रोटरी क्लब इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 रोजी कृत्रिम अवयव (हात-पाय) बसविण्याचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला जिल्हा दिव्यांग कल्याण कार्यालय, रेडक्रॉस सोसायटी व अळवण गल्ली येथील दिव्यांग संस्था यांचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती रोटरीचे उपप्रांतपाल अजय हेडा यांनी दिली.
बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दरवषी रोटरी परिवारतर्फे हे शिबिर घेतले जाते. 21 मार्च रोजी शिबिराला आलेल्या सदस्यांचे माप घेतले जाईल व त्यानंतर पुन्हा चार-पाच आठवडय़ांनी अवयव रोपण केले जाईल.
साधू वासवानी मिशन दरवषी शिबिरासाठी सहकार्य करत असून 2017 मध्ये 396 जणांनी तर गतवषी 300 जणांनी याचा लाभ घेतला. शिबिरासाठी 20 लाखांहून अधिक खर्च येत असून शिबिरार्थींकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. दि. 21 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1 या वेळेत विजया ऑर्थो येथे शिबिर होणार आहे. शिबिरासाठी विजया ऑर्थोचे डॉ. रवि पाटील यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभले आहे.
शिबिराला परगावांतून शिबिरार्थी येत असल्यास त्यांच्या निवासाची सोय त्यांनाच करावयाची आहे. मात्र, त्यांची व त्यांच्या समवेत असणाऱयांची भोजन व नाष्टय़ाची सोय आयोजकांतर्फे केली जाईल, असे अजय हेडा यांनी सांगितले.
रोटरीच्या ग्लोबल ग्रॅन्टअंतर्गत हे शिबिर होत आहे. 250 जणांनी नोंदणी केली असून इतर राज्यांतूनही विचारणा होत आहे. कृत्रिम हात किंवा पाय हे वजनाने हलके असून सहज हालचाल करण्याजोगे आहेत. अवयव बसविल्यानंतर पुढील फॉलोअप घेण्यासाठी अळवण गल्ली येथील दिव्यांग कल्याण संस्थेशी विचार विनिमय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी क्लबचे अध्यक्ष अशोक काडापूरे यांनी स्वागत केले. इव्हेंट चेअरमन प्रसाद कट्टी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इरफान शेखअली, शिंदे, रोटरी दर्पणच्या शीतल चिलमे आदी उपस्थित होते.