नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील बनावट व्हिडीओ संबंधात वृत्त निवेदन केलेले अँकर रोहित रंजन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. हा व्हिडीओ प्रसारित केल्याने त्याच्याविरोधात देशात अनेक ठिकाणी तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाऊन न्यायालयात उपस्थित राहून ही प्रकरणे हाताळणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे आपल्या विरोधातील सर्व प्रकरणे एकत्रित करुन एकाच ठिकाणी प्रकरण चालविण्यात यावे, अशी मागणी रंजन यांनी या याचिकेत केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राहुल गांधी यांच्या विरोधातील बनावट व्हिडीओ प्रसारित केल्याने रंजन हे अडचणीत आले आहेत. ते एका प्रसिद्ध टीव्ही वाहिनीचे अँकर आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात हा व्हिडीओ दाखविला होता. त्यावेळी तो बनावट असल्याचे त्यांना किंवा कोणालाच माहिती नव्हते. नंतर तो बनावट आणि डॉक्टर्ड असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी काँगेस कार्यकर्त्यांनी व राहुल गांधी समर्थकांनी रंजन यांच्या विरोधात तक्रारी सादर केल्या आहेत.
भाजप नेत्यांविरोधातही एफआयआर
हा व्हिडीओ शेअर करणाऱया भाजपच्या काही नेत्यांविरोधातही छत्तीसगडमध्ये तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. रंजन यांचा ताबा घेण्यासाठी छत्तीसगड पोलिसांनी प्रयत्न केले होते. ते त्यासाठी नोयडा येथे गेलेही होते. तथापि, त्याआधीच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा ताबा घेतल्याने छत्तीसगड पोलिसांना ताबा मिळाला नव्हता. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.