नॉर्थ साऊंड, ऍटीग्वा
येथे रविवारपासून सुरू झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान विंडीजने लंकेचा पहिला डाव 169 धावांत गुंडाळला. विंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डरने 27 धावांत 5 गडी बाद केले. दिवसअखेर विंडीजने बिनबाद 13 धावा जमविल्या.
या मालिकेत विंडीज संघाचे नेतृत्व पेग ब्रेथवेटकडे देण्यात आले आहे. तब्बल पाच वर्षांच्या कालावधीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱया माजी कर्णधार जेसन होल्डरने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. विंडीजने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकन संघातील थिरिमनेने एकाकी लढत देत 180 चेंडूत 4 चौकारांसह 70 तर डिक्वेलाने 76 चेंडूत 2 चौकारांसह 32, धनंजय डिसिल्वाने 26 चेंडूत 13, कर्णधार करूणारत्नेने 12 धावा जमविल्या. लंकेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. माजी कर्णधार होल्डरने 17.4 षटकांत 27 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची होल्डरची ही आठवी वेळ आहे. लंकेचे शेवटचे पाच गडी केवळ 19 धावांत तंबूत परतले. लंकेतर्फे यष्टीरक्षक डिक्वेला आणि थिरिमने यांनी सहाव्या गडय़ासाठी 58 धावांची भागिदारी केली. डिक्वेला सहाव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. विंडीजचा वेगवान गोलंदाज रॉशने 47 धावांत 3 तर कॉर्नवॉलने 25 धावांत 1 गडी बाद केला. 32 वर्षीय रॉशने 62 व्या कसोटी सामन्यात बळींची संख्या 208 पर्यंत नेली आहे. रॉशने खेळाच्या पहिल्या दिवशी दुसऱया सत्रात लंकेचे दोन गडी बाद केले.
लंकेचा पहिला डाव 169 धावांत शेवटच्या सत्रात आटोपल्यानंतर विंडीजने दिवसअखेर 13 षटकांत बिनबाद 13 धावा जमविल्या. कर्णधार ब्रेथवेट 3 तर कँपबेल 7 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 69.4 षटकांत सर्वबाद 169 (थिरिमने 70, डिक्वेला 32, डिसिल्वा 13, करूणारत्ने 12, निशांका 9, होल्डर 5-27, रॉश 3-47, कॉर्नवाल 1-25), विंडीज प. डाव 13 षटकांत बिनबाद 13 (ब्रेथवेट खेळत आहे 3, कँपबेल ंखेळत आहे 7).