वृत्तसंस्था/ पल्लीकेले
येथील पल्लीकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात दिनेश चंडीमल आणि पी. निसांका यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान लंकेने झिम्बाब्वेचा 5 गडय़ांनी पराभव करून तीन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली.
हा सामना दिवस-रात्रीचा खेळविला गेला. या सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करणाऱया झिम्बाब्वे संघातील शॉन विलियम्सने 87 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 100 धावा झळकविल्या. लंकेच्या भक्कम फलंदाजीमुळे विलियम्सचे हे शतक वाया गेले. झिम्बाब्वे संघातील चेकाबेव्हाने 81 चेंडूत 6 चौकारांसह 72 धावा जमविल्या. लंकेतर्फे चमिका करुणारत्नेने 69 धावांत 3 तर व्हँडरसीने 44 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेचा सलामीचा फलंदाज निसांकाने 71 चेंडूत 10 चौकारांसह 75 धावा झळकविताना कुशल मेंडीससमवेत सलामीच्या गडय़ासाठी 40 धावांची भागिदारी केली. मेंडीसने 24 चेंडूत 6 चौकारांसह 26 धावा जमविल्या. यानंतर असालंका आणि चंडीमल यांनी धावांची गती राखली. असालेंकाने 68 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 71 तर चंडीमलने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 75 चेंडूत 91 धावा झळकविल्याने लंकेने 48.3 षटकात 5 बाद 300 धावा जमवित हा सामना 5 गडय़ांनी जिंकला. असालेंका आणि चंडीमल यांनी चौथ्या गडय़ासाठी 129 धावांची भागिदारी केली. झिम्बाब्वेतर्फे निगेरेव्हाने 56 धावांत 3 गडी बाद केले.