कोरोना संक्रमणामुळे दांपत्यावर सुरू आहेत उपचार
सध्या पूर्ण देश कोरोनाच्या संकटाला सामोरा जात आहे. संक्रमित होण्याची भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. लोक रुग्णालयात जाण्यासही घाबरू लागले असून त्यांच्यामध्ये नकारात्मकता वाढू लागली आहे. याचदरम्यान दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबादमधून समोर आलेले छायाचित्र कुठल्याही कोरोनाबाधितामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहे.
गाजियाबादमधील एका रुग्णालयात कोरोना आयसीयू वॉर्डमधून मनं जिंकणारे छायाचित्र समोर आले आहे. कोरोना वॉर्डमध्ये रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱयांनी येथे उपचार घेतलेल्या असलेल्या पती-पत्नीच्या विवाहाचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी केकही कापण्यात आला, अशाप्रकारच्या प्रयत्नांमुळे रुग्णांचे मनोबळ वाढत असते. कोरोना वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या या पुढाकारामुळे हे दांपत्य अत्यंत आनंदी दिसून आले आहे.
47 वर्षीय गजेंद्र चौधरी आणि त्यांची पत्नी 45 वर्षीय लक्ष्मीदेवी या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. दोघेही 1 मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची पत्नी आता संसर्गातून बरी झाली असून गजेंद्र यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो.
रुग्णालय व्यवस्थापनाला गजेंद्र चौधरी यांच्या विवाहाचा 21 वा वाढदिवस असल्याचे समजताच त्यांनी केक मागवून त्यांचा दिवस आनंदाचा केला आहे. गजेंद्र यांच्या पत्नीही यावेळी उपस्थित होत्या. रुग्णालय व्यवस्थापनाकडून विवाहाचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याने गजेंद्र चौधरी आणि त्यांच्या पत्नी अत्यंत भावुक झाल्या.