ऑनलाईन टीम / मुंबई :
स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांचे आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झालं. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सायंकाळी 6 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाला. तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर उपचारादरम्यान आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.