ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनावर लसीकरण हा रामबाण उपाय मानला जात आहे. देशातील कोरोनाची लढाई लढण्याकरीता कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा खारीचा वाटा आहे. आता या दोन्ही लस खुल्या बाजारात विकण्यास केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था यांच्या एक्स्पर्ट पॅनेलने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. हि शिफारस मान्य झाली तर या दोन्ही लस विक्रीसाठी लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या नियमित विक्री करण्यासाठी मान्यता देण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या या लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसी रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देता येतील. सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना लस विक्रीची मुभा असणार आहे.