ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशभरातील लष्कराच्या कॅन्टीन्सना आयात होणाऱ्या विदेशी वस्तूंची खरेदी रोखण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यामध्ये मद्याचाही समावेश आहे.
देशभरात जवळपास चार हजार लष्कर कॅन्टीन्स आहेत. या कॅन्टीनद्वारे लष्करी सेवेतील कर्मचारी, जवान आणि अधिकाऱ्यांना स्वस्तदरात गृहोपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मद्य दिले जाते. या कॅन्टीन्सद्वारे वर्षभरात 200 कोटी डॉलर्सची उलाढाल होते. मात्र, स्वदेशी वस्तूंना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आयात वस्तूंची खरेदी रोखण्याचा निर्णय 19 ऑक्टोबरला घेतला. काही महिन्यांपूर्वी लष्कर, हवाई दल आणि नौदलाशी चर्चाही करण्यात आली होती.
कॅन्टीनमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी 7 टक्के उत्पादने आयात केली जातात. डायपर, व्हॅक्यूम क्लीनर, हँडबॅग, लॅपटॉप यांसारख्या वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. मात्र, आयातीवर बंदी घालण्यात आलेल्या उत्पादनांची माहिती मंत्रालयाला अद्याप देण्यात आलेली नाही.