प्रतिनिधी /वास्को
भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी शनिवारी गोवा शिपयार्डला भेट दिली. या भेटीत त्यांनी गोवा शिपयार्डमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. गोवा शिपयार्डच्या जहाज बांधणी प्रकल्पाव्यतिरिक्त तटरक्षक दलासाठी बांधण्यात येत असलेल्या अति जलद गस्ती जहाज प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली.
भारतीय लष्कराने 12 अतिजलद गस्ती जहाजे बांधणीसाठी गोवा शिपयार्डबरोबर करार केला आहे. या प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. लष्कर प्रमुखांना गोवा शिपयार्डच्या अत्याधुनिक गस्ती जहाज व जहाजांच्या बांधकाम पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. लष्करप्रमुखांना अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या पहिल्या प्रोटोटाइप जहाजावरील प्लॅटफॉमच्या क्षमतेविषयी माहिती देण्यात आली. जहाजावरील डिझाइन केलेले फास्ट इंटरसेप्टर क्राफ्टही दाखविण्यात आले.
यावेळी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. बी. नागपाल यांनी गोवा शिपयार्डमध्ये पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावर असलेल्या विविध आधुनिकीकरण उपक्रमांची माहिती दिली. भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन तास गोवा शिपयार्डमध्ये होते.