डॉ.रेगो यांचे युवक-युवतींना आवाहन राज्याला रक्ताची वाढती गरज
प्रतिनिधी / फोंडा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील विविध इस्पितळांमध्ये रुग्णांसाठी रक्त पुरवठय़ाची गरज वाढू लागली आहे. या आणीबाणीच्या काळात जास्तीत जास्त लोकांनी स्वच्छेने रक्तदान करण्यास पुढे येण्याचे आवाहन मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळाच्या रक्तपेढी विभागाचे डॉ. रेविन रेगो यांनी केले आहे.
येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील लोकांचे कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. लस घेतल्यानंतर किमान 28 दिवस रक्तदान करता येत नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून लस घेण्यापूर्वी लोकांनी रक्तदान करावे असे डॉ. रेगो यांनी सांगितले.
फोंडा येथील डॉ. केतन भाटीकर्स स्पार्क आणि डॉ. कौतुक भाटीकर यांच्या हेल्थमेट होमियोपॅथीतर्फे मंगळवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. वरचा बाजार-फोंडा येथील श्री नक्टेश्वर सभागृहात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रेगो बोलत होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी फोंडा शाखा व हॉस्पिसियो इस्पितळाच्या रक्तपेढी विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरात साधारण 51 लोकांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. केतन भाटीकर, डॉ. कौतूक भाटीकर, सुदेश नार्वेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. भाटीकर बंधुंचे कौतुकास्पद कार्य
डॉ. केतन व कौतुक भाटीकर हे रक्तदान शिबिरासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढाकार घेत असून वर्षांतून किमान दोनवेळा ते अशी शिबिरे घडवून आणतात. समाजाप्रती त्यांचे हे योगदान उल्लेखनीय आहे, असे डॉ. रेगो यांनी पुढे बोलताना नमूद केले.
लसीकरणापूर्वी 18 वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, या उद्देशाने फोंडय़ात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी डॉ. केतन भाटीकर यांच्या तिस्क फोंडा येथील क्लिनिकमध्ये होणाऱया शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. कौतुक भाटीकर यांनी केले आहे.