निवडणूक आयोगाचे आरोग्य मंत्रालयाला निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र काढून टाकण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. यासंबंधी आयोगाने केंद्रीय आरोग्य खात्याला पत्र लिहून निर्देशांची तातडीने कडक अंमलबजावणी करण्यास बजावले आहे. यापूर्वी आयोगाने मोदींचे छायाचित्र असलेले पेट्रोल पंपांवरील बॅनर्स हटवण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीनेही कोरोना लस घेतल्याबद्दलच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदींच्या फोटोबाबतही आक्षेप घेतला होता.
सध्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू झाली असतानाही कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसत असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला होता. तृणमूलचे नेते खासदार डेरेक ओब्रायन यांनी यासंबंधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर आयोगाने ही कारवाई करत निवडणुका असलेल्या राज्यात कोरोनाच्या सर्टिफिकेटवरून मोदींचे छायाचित्र काढून टाकण्याचे आदेश दिले. आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मतदान संहितेच्या तरतुदींचे पालन कराण्यास बजावले आहे. तसेच हे आदेश निवडणुका होणाऱया पाचही राज्यात लागू होतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
टीएमसीच्या शिष्टमंडळाने कोरोना लस प्रमाणपत्र आणि पेट्रोल पंपवरील जाहिरातींमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोंना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. शिष्टमंडळात आलेल्या ममता सरकारचे मंत्री फरहाद हकीम यांनी याला ‘सरकारी यंत्रणेचा गैरवापर’ असे संबोधले आणि निवडणूक आयोगाला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.