उत्तर प्रदेशातील घटना, ‘व्हॅक्सिन जिहाद’चा सोशल मीडियावर आरोप
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्हय़ातील एका लसटोचणी केंद्रातील नर्स निहा खान हिने लस टोचण्याचा बहाणा करत लसी कचरापेटीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या नर्सला आता निलंबित करण्यात आले असून तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. या प्रकरणात मुख्य लसीकरण अधिकारी डॉ. आफ्रिन यांची बदली करण्यात आली असून दक्षता बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच चौकशीचाही आदेश देण्यात आला आहे.
ही नर्स लस टोचण्याऐवजी केवळ सुई टोचत होती आणि लसीकरण झाल्याचे सांगत होती. लसीने भरलेल्या बाटल्या तिने कचरा पेटीत फेकून दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. लसीच्या 29 बाटल्या तिने कचरापेटीत फेकल्याचे उघड झाले. ही बाब एका रुग्णाच्याच लक्षात आली. त्याने कचरापेटीत डोकावून पाहिले असता लसीने भरलेल्या बाटल्या आढळून आल्या. नंतर ही नर्स लस टोचण्याचा बहाणा कसा करते, याचा व्हिडीओ काढण्यात आला असून तो सोशल मीडियावर सर्वत्र प्रसारित होत आहे. या नर्सवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या नर्सचे हे कृत्य तिचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. आफ्रिन यांना माहित असूनही त्यांनी ते लपवून ठेवल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
चौकशीचा आदेश
अलिगढचे मुख्य वैद्यकीय अधिकारी भानू प्रताप कल्याणी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे. यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. के. माथूर यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. निहा खान हिने ज्यांना लस टोचण्याचा बहाणा केला, ते सर्वजण 18 ते 44 वयोगटातील आहेत. त्यांची नावे लसीकरण झालेल्यांच्या यादीत समाविष्टही करण्यात आली आहेत.
उद्देश काय होता ? नर्स निहा खान लस टोचण्याचा केवळ बहाणा करून लसी फेकून का देत होती, यावर आता संशोधन सुरू आहे. सोशल मीडियावर तिच्या या कृत्यामुळे गदारोळ उठला असून हा ‘व्हॅक्सिन जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. लोकांना कोरोना व्हावा, या यामागे उद्देश असल्याचीही शंका व्यक्त होत आहे. असे कृत्य करून तिने नर्सच्या उदात्त व्यवसायाला काळिमा फासल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अशाप्रकारे लस टोचून घेतलेल्यांना कोरोना झाल्यास लसींबद्दलही शंका निर्माण व्हावी आणि एकंदर लसीकरण कार्यक्रम अपयशी ठरावा असाही उद्देश यामागे असावा असा संशय अनेकजण व्यक्त करीत आहेत. म्हणूनच तिच्या या कृत्याचे वर्णन सोशल मीडियावर ‘व्हॅक्सिन जिहाद’ असे केले जात आहे.