नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता देखील काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशात मोठ्याप्रमाणात लसीकरण केले जात आहे. मात्र काही लोक लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एक अजब नियम केला आहे. सध्य़ा या अजब नियमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफईमधील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल तर दारू मिळणार नाही, अशी नोटीस लावण्यात आली आहे. ही नोटीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार लावण्यात आली आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला अलिगडमध्ये विषारी दारू पिऊन कमीतकमी २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हेम कुमार सिंह यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सैफई येथील दारू दुकानांची तपासणी केली. यानंतर हेम कुमार सिंग यांनी दारू दुकानांना स्पष्टपणे ‘लस नाही तर दारू नाही’ अशी नोटीस लावण्याच्या सूचना दिल्या.