200 हून अधिक नागरिकांना संघर्षानंतर मिळाले दुसरे डोस
प्रतिनिधी/ चिपळूण
मार्चच्या पहिल्या आठवडय़ात कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात दुसऱया डोससाठी संदेश आला. त्यानुसार केंद्रावर लस घेण्यासाठी हजेरीही लावली. मात्र केंद्रावरील लस संपल्याने माघारी परतावे लागले. परंतु डोस घेतलेला नसतानाही संकेतस्थळावर डोस घेतल्याची नोंद दिसू लागली. या बाबत लसीकरण केंद्रात सविस्तर माहिती दिल्यानंतर अखेर 2 दिवसांपूर्वी ऑफलाईनने अशा सुमारे 200 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. यामुळे लसीकरणाच्या नोंदींबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र हे कसे घडले, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. संबंधितांना डोस मिळाले असले तरी त्या दिवशी 200 डोस नेमके कुणाला दिले गेले, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
चिपळुणात मार्च महिन्यात पहिल्याच आठवडय़ात लसीकरण झालेल्या काही नागरिकांना एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी मेसेज आला. त्यानुसार नमूद तारखेला या व्यक्ती पवन तलाव येथील केंद्रावर हजर झाल्या. मात्र तत्पूवीच डोस संपल्याने संबंधित व्यक्तींना दुसरा डोस न घेताच घरी परतावे लागले. असे असूनही अधिकृत संकेतस्थळावर मात्र या नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची नोंद व तसे प्रमाणकत्रही दर्शवण्यात येत असल्याने गोंधळ आणखीनच वाढला. एकीकडे दुसऱया लसीकरण डोसच्या कालावधाचे काही दिवसच शिल्लक दुसरीकडे डोसबाबत काहीच स्पष्टता होत नव्हती. यासाठी लसीकरण केंद्रावर वारंवार संपर्क साधूनही त्यांना डोस उपलब्ध होत नव्हता. यामुळे काही मंडळींनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला.
प्रारंभी आरोग्य विभागही निश्चित काय झाले व त्यावरील मार्ग, या बाबत काहीही सागू शकत नव्हता. मात्र काही नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी अखेर 15 मार्चपूर्वी पहिला डोस घेतलेल्या सुमारे 200 जणांना ऑफलाईनने दुसरे डोस देण्यात आले. अजूनही असे काही नागरिक असून त्यांनाही लवकरच दुसरे डोस दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाकडे या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही
…आणि पुढील मनस्ताप टळला !
मुळातच ज्या केंद्रावर पहिला डोस देण्यात आला त्या ठिकाणी दुसरा डोस सहज मिळेल या अपेक्षेने आम्ही गेलो. मात्र आधी येऊन टोकन घेतलेल्या लोकांना लस देण्यात आली. ळास संपल्याने आम्ही परत आलो. मात्र आम्ही डोस घेतलेला नसतानाही संकेतस्थळावर आमच्या नावावर लस घेतल्याचे दिसत असल्याने गोंधळ उडाला. पण दोन दोन दिवसांपूर्वी मुदत संपण्यापूर्वीच डोस मिळाला आणि पुढील मनस्ताप टळला
– श्री. लाड,
चिपळूण