प्रतिनिधी/ लांजा
लांजा-कुक्कुटपालन परिसरातील भंगार टायर आणि पुट्ठय़ाच्या गोदामाला शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेनंतर आकाशात प्रचंड धुराचे लोळ उठले. नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नांनी 2.30 च्या दरम्यान ही आग आटोक्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
उत्तरप्रदेश येथील विजयकुमार बेन हे पत्नी आणि मुलांसह गेल्या 35 वर्षांपासून लांजा येथे वास्तव्यास आहेत. मुंबई-गोवा महामार्गालगत लांजा कुक्कुटपालन येथे त्यांचे पुठ्ठा आणि भंगार टायरचे गोदाम आहे. शुक्रवारी दुपारी 1 च्या दरम्यान अचानक या गोदामाला आग लागली. सुरुवातीला 1-2 टायरनी पेट घेतला मात्र त्यानंतर काही कळायच्या आतच भंगार टायर आणि पठ्ठय़ाने पेट घेतल्याने आग भडकली. आग, धुराचे लोट आकाशाला भिडले आणि आगीने प्रचंड रूप धारण केले.
गोदामाला आग लागल्याचे कळताच लांजातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लांजा नगर पंचायतचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील आणि पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा टँकर बोलावण्यात आला. नगरसेवक स्वरूप गुरव, मंगेश लांजेकर, राजू हळदणकर तसेच राजू इंगळे, राजू जाधव, मंदार गांगण, प्रसाद भाईशेटे, सचिन लिंगायत, बाबा लांजेकर, शिवा ऊकले व अन्य नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.