वृत्तसंस्था/ बार्सिलोना
अर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी हा सध्या बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधित्व करीत आहे. नजीकच्या भविष्यकाळात मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार असून तो मँचेस्टर सिटी संघात दाखल होणार असल्याची अफवा पसरली आहे. मात्र, यात कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मेस्सीचा बार्सिलोना क्लबरोबरचा करार 2021 साली संपुष्टात येणार आहे. क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना संघाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2019-20
फुटबॉल हंगामात बार्सिलोना संघाची विविध स्पर्धांमधील कामगिरी समाधानकारक होऊ शकली नाही. मेस्सीसारख्या जागतिक दर्जाच्या फुटबॉलपटूची कामगिरी त्याच्या कारकीर्दीला योग्य अशी होऊ शकली नाही. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पात्रतेसाठी बार्सिलोना संघाला झगडावे लागले होते. लवकरच बार्सिलोना क्लबच्या पदाधिकाऱयांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीनंतर क्लबचे नवे अध्यक्ष व इतर पदाधिकारी मेस्सीबद्दल निर्णय घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 33 वर्षीय मेस्सी प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया मँचेस्टर सिटी संघात दाखल होणार असल्याची अफवा पसरली आहे. पण या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.