क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याच्या 14 वर्षीय लिऑन मेंडोंसाला बुद्धिबळमध्ये ग्रँडमास्टर किताब प्राप्त झाला आहे. इटलीत झालेल्या एका स्पर्धेत त्याने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म मिळविला आहे. अनुराग म्हामलनंतर ग्रँडमास्टर बनणारा लिऑन ल्यूक मेंडोंसा आता गोव्याचा दुसरा तर बुद्धिबळ खेळामधील देशातील 67 वा ग्रँडमास्टर बनला आहे. 2020 वर्षाचा अखेरचा दिवस गोड करताना लिऑनने गोवेकर क्रीडाप्रेमींना आनंदाची बातमी देऊन सुखावले.
ऑक्टोबर महिन्यात रिगो चेस ग्रँडमास्टर राऊंड रॉबीन लिऑनने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला आपला पहिला नॉर्म मिळविला होता. त्यानंतर मागील नोव्हेंबर महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत लिऑनने दुसरा नॉर्म प्राप्त केला. इटलीत बासॅनो डेल ग्रप्पा येथे झालेल्या वर्गानी चषक चेस स्पर्धेत लिऑन मेंडोंसाने 6.5 गुणांनी दुसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत युक्रेनच्या विटाली बर्नाडस्कीला 7 गुणांनी जेतेपद मिळाले.
लॉकडाऊनमुळे अडकला, खेळात रमला!
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन आणि प्रवासाच्या निर्बंधाच्या पाश्वभूमीवर लिऑन आणि त्याचे वडील लिंडन मेंडोंसा मार्चमध्ये युरोपमध्ये अडकले होते. त्यांनी यात एक संधी पाहिली आणि ग्रँडमास्टर पदवी संपादन करण्याच्या उद्देशाने साळगावच्या लिऑनने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मार्च ते डिसेंबर महिन्यांत तब्बल 16 स्पर्धांमध्ये लिऑन खेळला आणि 2452 गुणांच्या एलो रेटिंगमधून तो 2544 रेटिंगवर आला.
सहकार्य, प्रशिक्षणाबद्दल मानले आभार
ग्रँडमास्टर बनल्याबद्दल लिऑन मेंडोंसाने आनंद व्यक्त केला असून ज्यांनी आपल्या ग्रँडमास्टरपर्यंतच्या प्रवासासाठी सहकार्य दिलेल्या आणि प्रशिक्षणाबद्दल आभार मानले आहेत. मी बरीच मेहनत घेतल्यानंतर हे घडले आहे. माझ्या या यशाबद्दल मी माझे पालक, प्रशिक्षक विशू प्रसन्ना आणि प्रायोजकांचेही आभार मानत असल्याचे लिऑन म्हणाला.
चेन्नईचा आकाश देशाचा 66वा ग्रँडमास्टर
माजी विश्वविजेते व्लादिमीर क्रॅमनिक आणि बोरिस गेलफँड यांनी 2010 साली अनेक भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण दिले तेव्हा, गोव्याच्या या प्रतिभावंत बुद्धिबळपटूने चेन्नईत झालेल्या मायक्रोसेन्स आयोजित शिबिरात भाग घेतला होता. ग्रँडमास्टरचा दुसरा नॉर्म मिळाल्यानंतर युरोपमध्ये राहणे आणि स्पर्धांमध्ये भाग घेणे आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचे लिऑनच्या वडिलांनी म्हटले होते. जुलै महिन्यात चेन्नईचा आकाश देशाचा 66वा ग्रँडमास्टर बनला होता.
गोव्याचा दुसरा आणि देशातील 67 वा ग्रँडमास्टर बनल्याबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी लिऑन मेंडोंसाचे अभिनंदन केले आहे.