दिवाणखाना किंवा लिव्हिंगरूम ही घराची जान समजली जाते. आपण कसे आहात याविषयीची कल्पना या खोलीच्या अंतरंगावरून आलेल्याला समजते. आपला दृष्टीकोन व व्यक्तिमत्त्वाविषयीची माहिती आलेल्याना कळते. ही खोली सजवताना आपण आवडीचा विचार करतो. हे करताना डिझाइनचा विचार योग्यरित्या होत नाही. तिथे आपलं दुर्लक्ष होतं.
आपल्या लिव्हिंगरूमची सजावट लवचिक ठेवायला हवी. आवश्यक वाटल्यास सजावटीच्या अंतरंगात केव्हाही बदल करता आला पाहिजे.
प्रकाशव्यवस्था- प्रकाशयोजना योग्य तऱहेची नसेल तर सजावटीची छाप उठून दिसणार नाही. सर्वत्र प्रकाशाची मात्रा खोलीत असेल याची काळजी घ्या.
खोलीत छतावर एकच टय़ुब किंवा दिवा लावणे फार चुकीचे ठरते. छतावर एलइडीची प्रकाशयोजना करणे उत्तम ठरते. याशिवाय फ्लोअर लॅम्प, झुंबराचा आवश्यकतेनुसार केलेला वापर सही ठरतो.
योग्य कार्पेटची निवड- कार्पेटची निवड योग्यतेने व्हायला हवी. खोलीचा आकार आणि खोलीतील सजावटीची थीम लक्षात घेऊन कार्पेट खरेदी करायला हवे. रंग निवडतानाही खोलीतल्या सोफा, पडदे यांचा रंग ध्यानात घ्यायला हवा. या सर्वांशी मेळ खाणारा रंग कार्पेटचा असायला हवा.
फर्निचरची मांडणी हा या खोलीचा महत्त्वाचा गाभा असतो. त्यामुळे सोफा योग्य ठिकाणी रचला जायला हवा. चुकीच्या ठिकाणी टीव्ही ठेवून चालत नाही. सोफ्याच्या मागे टीव्ही येणार नाही ही काळजी घ्यायला हवी.
सोफा हा भिंतीला लागून ठेवण्याची चुक अनेकांच्या घरात केलेली आढळते. अशाने खोली मोठी भासते असा समज आपण करतो. पण सजावटीत ते दिसायला खराब दिसते.
गडद रंग- बाहेरून प्रवेश केल्यानंतरची ही महत्त्वाची खोली असलेने रंग फिकेच ठेवायला हवेत. या खोलीला गडद रंग वापरल्यास खोली छोटी भासते. गडद रंग वापरायचा असेल तर एका भिंतीला तो देता येईल. एक भिंत गडद रंगाची आणि बाकीच्या तीन भिंतींना फिक्या रंगाची निवड करता येते.
जुनं ते सोनं – आपण नव्या घरात प्रवेश करताना काही जुन्या वस्तुंना सामावून घेत असतो. जुनं ते सोनं यानुरूप नव्या जुना सोफा ठेवणं चुकीचं ठरू शकतं. याने सजावटीची रयाच हरवून बसण्याची शक्य़ता असते. नव्या रचनेचा सोफा येथे समाविष्ट करणे इष्ट ठरते.
दिवाणखान्याचा वापर बैठकीची खोली म्हणून व पाहुण्यांचे स्वागत करण्याची म्हणूनच व्हायला हवा. आपला फावला वेळ आपण या खोलीत व्यतीत करत असतो. याच खोलीत जिम, झोपणे, खाणे-पिणे, व्यायाम अशा गोष्टी करू नयेत.
सजावट नेमकी- या खोलीची सजावट गरजेपेक्षा जास्त करता कामा नये. बैठकीची खोली आर्ट गॅलरी होऊ नये, याची काळजी घ्यावी.
फर्निचरची संख्या मर्यादीत ठेवावी व इतर सर्व गोष्टी व्यवस्थित रचाव्यात.
पडदे- खिडकीच्या आकारमानाप्रमाणे पडदे बसवण्याची फॅशन आता कालबाह्य़ होऊ लागली आहे. जमिनीपर्यंत लोंबकळणारे पडदे वापरायला हरकत नाही. पडदे वरच्या नळीवर लावताना थोडे जास्त उंच लावणे योग्य ठरते.