- 13 व 14 मार्चला साताऱ्यात होणार संमेलन
ऑनलाईन टीम / पुणे :
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शहापुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. 13 आणि 14 मार्च रोजी होणा-या या संमेलनाच्या अध्यक्षपदी नामनंत लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी दिली.
ते म्हणाले, या दोन दिवसीय संमेलनात प्रकाशकांच्या समस्या, व्यवसायापलीकडचे लेखक-प्रकाशक स्नेहबंध, नामवंत लेखक आणि प्रकाशकांच्या मुलाखती असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
या संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष नामनंत लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी कथा, कादंब-या धार्मिक, संस्कृत, अनुवाद आदी साहित्य प्रकारांत शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘पॅपिलाॅन’, ‘बॅंको’, ‘गाॅडफादर’, ‘जॅकडाॅज’, ‘सेकंड लेडी’, ‘मम आत्मा गमला’, ‘बिटवीन शेडस ऑफ ग्रे’, ‘तिसरे महायुद्ध’, ‘अल्बर्ट आइन्स्टाईन’, ‘पेलिकन ब्रिफ’, ‘काैटिल्याचे अर्थशास्त्र’, ‘सत्तर दिवस’, ‘कोमा’, ‘चार्ली चॅप्लिन ‘सुवर्णयोगी’ असे त्यांचे विपूल साहित्य प्रसिद्ध झाले आहे.
या संमेलनास सर्व लेखक-प्रकाशक आणि साहित्यप्रमींनी मोठ्या संख्येन उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शहापुरी शाखेचे विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.