465 कामगारांना सेवेत कायम करण्याची मागणी, एका महिन्यात सोपस्कार पूर्ण करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /कुडचडे
गेली सात वर्षे तसेच काही जण त्याहून अधिक काळापासून असे एकूण 465 कामगार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लेबर सोसायटीमध्ये काम करत आहेत. त्यातील 18 कामगारांना दहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे, तर 447 कामगारांना लवकरच आठ वर्षे पूर्ण होणार आहेत. तरी सुद्धा याअगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे सेवेत कायम करण्याच्या बाबतीत कोणतेच सोपस्कार न झाल्याचे दिसून आल्यामुळे सदर कामगारांच्या या अडचणीत लक्ष घालण्याची विनंती आपण काही कामगारांसह सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना भेटून केली आहे. त्यांनी एका महिन्यात सदर सोपस्कार पूर्ण करण्यात येणार असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कामगार मंजिरी नाईक यांनी मंत्र्यांच्या भेटीनंतर या प्रतिनिधीला दिली.
आपण एक सामान्य कामगार असून महिन्याला बारा हजार पगार दिला जातो, तर काहींना आठ हजार रुपये देण्यात येतात. सदर पगारातील काही पैसे तर येण्या-जाण्यावरच खर्च होतात. सध्याच्या वाढलेल्या महागाईत या पगारात सामान्य कुटुंबाने कसे जगावे हेच कळत नाही. यासंबंधी आम्ही बांधकाममंत्र्यांजवळ सर्व अडचणी मांडून निवेदन दिलेले आहे. तसेच त्यांनीही हा मुद्दा लवकरात लवकर सोडविण्यात येणार असे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी याअगोदर दिलेली आश्वासने पूर्ण केलेली आहेत व हे आश्वासन देखील ते पूर्ण करतील अशी आशा आम्ही बाळगली आहे, अशी माहिती कामगार कुशा नाईक यांनी दिली.
कामगारांना सेवेत कायम करणार : पाऊसकर
यासंबंधी मंत्री पाऊसकर यांनी सांगितले की, आज जे कामगार आपल्याकडे आले होते ते त्यांच्या हक्कासाठी आले होते. कारण सा. बां. खात्याच्या कामगार सोसायटीखाली जे कामगार घेण्यात येतात त्यांनी आठ वर्षे काम करणे गरजेचे असून त्यानंतर त्यांना सेवेत कायम करण्याचा सोपस्कार करण्यात येतो. याही कामगारांना या पद्धतीच्या खाली सेवेत कायम करण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबरच्या दोन कामगारांना आठ वर्षे पूर्ण व्हायला एक-दोन महिने कमी पडतात. पण त्यांच्या मागणीनुसार त्यांनाही कायम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे, अशी माहिती पाऊसकर यांनी दिली.