युवा समिती पदाधिकाऱयांच्या प्रयत्नाला यश
बतमीदार / खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे ‘लैला शुगर्स’ तर्फे शेतकऱयांची थकीत बिले देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात शेतकऱयांच्या खात्यावर 80 लाख रुपयांची बिले जमा करण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसात चार कोटींची बिले दिली जातील, अशी माहिती युवा समितीच्या पदाधिकाऱयांना कारखाना व्यवस्थापनातर्फे देण्यात आली.
जानेवारी महिन्यापासून पाठविण्यात आलेल्या उसाची बिले गेल्या सहा महिन्यांपासून देण्यास ‘लैला शुगर्स’ कडून टाळाटाळ करण्यात येत होती. याची माहिती मिळताच काही दिवसांपूर्वी युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी कार्यकारी व्यवस्थापक सदानंद पाटील यांना जाब विचारला होता. बिले वेळेत जमा न केल्यास कारखान्यासमोर शेतकऱयांसह आंदोलन करण्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला होता. त्यानंतर ही बिले आज करतो उद्या जमा करतो, असे सांगून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी पदाधिकाऱयांनी पुन्हा बिले द्यावीत, अशी मागणी केली होती. मात्र, कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारी पुन्हा कारखाना स्थळावर युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी बिले कधी जमा करणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी कोरोनामुळे बिल देण्यास विलंब झाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी 80 लाख रुपये शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून आगामी दोन दिवसात इतर शेतकऱयांनाही बिले दिली जाणार आहेत, अशी माहिती दिली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदाशिव पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, परशराम गोरे, राहुल पाटील, सहदेव हेब्बाळकर आदी उपस्थित होते.