सीआयडीच्या अधिकाऱयांनी घेतले फुटेज ताब्यात : उपचार करणाऱया डॉक्टरांकडूनही घेतली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झालेल्या लॉकअप डेथ प्रकरणी सोमवारी दुसऱया दिवशीही सीआयडीच्या अधिकाऱयांनी चौकशी केली. सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांकडून घटनेची माहिती घेतली व सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.
शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी बेल्लद बागेवाडी येथील बसनगौडा पाटील (वय 45) याला गांजा प्रकरणी चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी रविवारी सीआयडीचे पथक बेळगावात दाखल झाले होते. त्यानंतर पुन्हा सोमवारी बेंगळूरहून आणखी दोघे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत.
सोमवारी सकाळपासून सीआयडीचे एक पथक बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तळ ठोकून होते. अधिकारी व पोलिसांकडून पुन्हा माहिती घेण्यात आली आहे. सायंकाळी पोलीस उपअधीक्षक गिरीमल्ल तळकट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. आण्णासाहेब पाटील यांची भेट घेऊन आपत्कालीन विभाग, आयसीयूमध्ये पाहणी केली. बसनगौडावर उपचार करणाऱया डॉक्टरांकडून त्या शुक्रवारी रात्री नेमके काय घडले? याविषयी माहिती घेण्यात आली. दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. अधिकाऱयांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. मात्र ते अद्याप त्यांना मिळाले नाहीत. सिव्हिल हॉस्पिटलमधील फुटेज त्यांनी ताब्यात घेतले आहेत. प्रकरण दडपण्यासाठी पोलीस स्थानकातील फुटेज गायब करण्याचीच शक्मयता अधिक आहे. दरम्यान, बेळगाव येथील लॉकअप डेथ प्रकरणी काँग्रेसने ट्विट केले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाजपच्या राजवटीत पोलिसांचा अतिरेक वाढला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पोलीसच जबाबदार ठरतात. तो आजारी होता तर त्याला योग्य उपचार का देण्यात आले नाहीत? गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनीच उत्तर द्यावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
दिवसेंदिवस या प्रकरणातील गूढ अधिक गडद होत चालले आहे. बसनगौडाचे हात दोरीने बांधण्यात आले होते. त्याचे व्रण आपण पाहिले आहेत, असे मुलगी रोहिणी हिने सांगितले होते. त्यामुळेच शवचिकित्सा अहवालात याचा उल्लेख येऊ नये यासाठीही पोलीस अधिकाऱयांची धडपड सुरू झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार लॉकअप डेथ प्रकरणात तीन तज्ञ डॉक्टरांच्या पथकांकडून शवचिकित्सा केली जाते. या प्रकरणात हे नियमही धाब्यावर बसविण्यात आले आहेत, असा आरोप केला जात आहे. प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये यासाठी पोलिसांनी धडपड सुरू केली आहे.
यासंबंधी ‘तरुण भारत’ने सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी संपर्क साधला असता प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. सीआयडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. चौकशी अंतीच सत्य बाहेर येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कुटुंबीयांचीही भेट घेणार
चौकशीसाठी बेळगावात दाखल झालेले अधिकारी एक-दोन दिवसांत बसनगौडा यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन यासंबंधी माहिती घेणार आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक माहिती जमविल्यानंतर हे अधिकारी कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.