प्रतिनिधी/ बेळगाव
एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येते. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने सवलतीची मुदत 30 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी देखील लॉकडाऊनच्या कालावधीत मालमत्ताधारकांनी एक कोटी सात लाखाची घरपट्टी भरली आहे.
मागील वर्षापासुन ऑनलाईनद्वारा घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पेटीएम, डेबीट व पेडिट कार्डद्वारे घरपट्टी भरण्याची सोय महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती. या सुविधेद्वारे मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात एक कोटी सात लाखाची घरपट्टी भरली आहे. यामध्ये डेबीट आणि पेडिट कार्डद्वारे अधिक पसंती दर्शविली आहे. देशभरात कोरोना विषाणुचा प्रसार झाल्याने महापालिकेने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे मार्च महिन्यात घरपट्टी वसुल करण्यात अडथळे निर्माण झाले होते. महसुल विभागासह मनपाचे कर्मचारी कोरोना विषाणुच्या जनजागृतीच्या आणि खबरदारीच्या कामात गुंतल्याने घरपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे घरपट्टी भरण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. एप्रिल महिन्यात कर भरणाऱयांना 5 टक्के सवलत देण्यात येते. पण लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर येणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे सवलतीच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी देखील ऑनलाईनद्वारा घरपट्टी जमा करता येऊ शकते. या सुविधेद्वारे शहरवासीयांनी घरपट्टी भरणा केली आहे.