कंटेन्टमेंटबाहेरील संग्रहालये, स्मारक खुली, ऐतिहासिक वास्तू, किल्ले पर्यटकांसाठी खुले
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यात कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊनची मुदत 28 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे कंटेन्टमेंट झोन वगळता सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये सुरू करण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हÎात गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाले. जुलैनंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू आहे. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात आला आहे सध्या कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्र व सुट, वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी पुर्ववत सुरु राहतील. लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यत वाढवले आहे. या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला आहे.
दरम्यान, जिह्यातील कंटेन्टमेन्ट झोन बाहेरील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर पर्यटक, नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले. त्यामुळें शहरातील टाऊन हॉल उद्यानातील संग्रहालय, राजारामपुरीतील मांडरे कला संग्रहालय, शासकीय विश्रामगृह परिसरातील उद्यान पर्यटकांसाठी शनिवारपासून खुले झाले आहे.
ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालयाच्या ठिकाणी आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालयाद्वारे निर्गमित केलेल्या मानक कार्यप्रणालींचा अवलंब करणे बंधनकारक आहे. येथे आवश्यक शारिरिक अंतर, मास्क व वेळोवेळी हात निर्जंतुकीकरण करणे संबंधितांवर बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱयांच्या आदेशात स्पष्ट केले आहे.