एक पुण्यातील तर दुसरा स्थानिक : एकाचा शोध नाही, दुसऱयाचा मृतदेह सापडला
प्रतिनिधी / वैभववाडी:
तालुक्मयातील लोरे नं. 2 येथील आपल्या मित्राच्या गावी फिरण्यासाठी आलेला पिंपरी- पुणे येथील तरुण शिवगंगा नदीपात्रात वाहून गेला. भूषण लॉमवेल नाईक (40, रा. संत तुकारामनगर, सुखवानी कॅम्पस, पिंपरी-पुणे) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र, भूषणचा शोध लागला नव्हता. या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, देवगड-नाडण येथेही रविवारी नितीन रामचंद्र घाडी (38) या तरुणाचा ओहोळाच्या बंधाऱयात बुडून मृत्यू झाला.
मूळ लोरे नं 2 येथील नितीन नारायण पेडणेकर हे नोकरीनिमित्त पिंपरी- पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे लोरे गावात नेहमी येणे- जाणे असते. 26 ऑगस्ट रोजी नितीन पेडणेकर हे संदीप जाधव, आशिष म्हसे व भूषण नाईक या आपल्या मित्रांसह खासगी वाहनाने गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथे एक दिवस थांबून 27 ऑगस्ट रोजी ते लोरे येथे आले. 28 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी स्वतःच्या बागेत जेवण केले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण लोरे नं 2 येथील शिवगंगा नदीपात्रातील ‘कोळदा कोंड’ याठिकाणी आंघोळीसाठी गेले. कुर्ली धरणामुळे या नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक होता. या नदीपात्रात पेडणेकर व त्याच्या एका मित्राने उडी मारली व ते पोहत पलिकडे गेले. त्यानंतर भूषणने नदीपात्रात उडी घेतली. यात त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या
प्रवाहात वाहून गेला. ही बाब लक्षात येताच मित्रांनी भूषणचा नदीपात्रात शोध घेतला. मात्र तो सापडू शकला नाही. घटनेची माहिती नितीन पेडणेकर यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दिली.
स्थानिकांच्या मदतीने पोलिसांचे शोधकार्य
दरम्यान, पोलिसांनी घटनेची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाला दिली. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या भूषणच्या शोधासाठी रविवारी सकाळपासून शोध मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार नितीन खाडे, पोलीस नाईक राहुल पवार, कॉन्स्टेबल संतोष शिंदे, स्थानिक ग्रामस्थ रितेश सुतार, माजी सरपंच महेंद्र रावराणे, पोलीस पाटील लवू रावराणे, दिगंबर रावराणे यांनी स्थानिक ग्रामस्थांसमवेत शोध मोहिमेत सहभाग घेतला.
सहय़ाद्री जीवरक्षक दलाला पाचारण
घटनेची माहिती मिळल्यानंतर तहसीलदार रामदास झळके, मंडल अधिकारी श्री. कदम, तलाठी श्री. बडे हेदेखील लोरे येथे दाखल झाले. या युवकाच्या शोधाकरिता करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक दलाला पाचारण करण्यात आले. या पथकाने नदीपात्रात शोधकार्य राबविले. तसेच पियाळीपर्यंतचा भाग पिंजून काढला. दुपारी पडलेल्या पावसामुळे शिवगंगा नदीचे पाणी गढूळ झाल्याने शोधमोहिमेत व्यत्यय येत होता. सायंकाळी साडे सहा वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली. मात्र, शोध लागला नव्हता.
नाडण बंधाऱयात तरुण बुडाला
देवगड : तालुक्यातील नाडण वरची पुजारेवाडी येथील नितीन रामचंद्र घाडी (38) या तरुणाचा ओहोळाच्या बंधाऱयात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद उशिरा देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडण-पुजारेवाडी येथील नितीन घाडी हा रविवारी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरानजीकच्या दुकानात गेला होता. त्यानंतर तो तेथूनच 100 मीटर अंतरावरील ओहोळाच्या ठिकाणी गेला. त्या ओहोळाच्या बंधाऱयावरून त्याचा पाय घसरला व तो बुडाला. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तेथील रामदास घाडी हे ओहोळानजीक गेले असता त्यांना पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलीस पाटील अजित महाडिक यांना दिली. महाडिक यांनी घटनास्थळी पाहणी करत देवगड पोलीस ठाण्याला कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. हा मृतदेह नितीन घाडी याचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचा पंचनामा करून सायंकाळी उशिरा मृतदेह विच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
नितीन घाडी याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नितीन हा घरातील एकुलता कमविता होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे घाडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.