आमदार विजय सरदेसाई यांनी दिलेली माहिती : मुख्य सचिवांच्या नजरेस विषय आणणार
प्रतिनिधी / मडगाव
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 20 जानेवारीला मडगावातील लोहिया मैदानाला भेट दिली होती व नंतर प्रशासनाला लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. या घटनेला पाच महिने उलटले, तरी कामास प्रारंभ करण्याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत राज्यपालांचे लक्ष वेधले असता त्यांनीही संताप व्यक्त केल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.
आपण मंत्री असताना जी-सुडाच्या मार्फत सदर सौंदर्यीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात 2 कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. फक्त आर्थिक मंजुरी देऊन कामाचे आदेश देण्यास विलंब होत असल्याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले. आता सदर विषय आपण मुख्य सचिवांच्या नजरेस आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी आमदार असताना सरदेसाई यांनी या प्रकरणी विधानसभेत आवाज उठविला होता. नंतर सत्तेत आल्यावर मंत्री या नात्याने त्यांनी लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया मार्गी लावून जी-सुडामार्फत निविदा काढण्यात आल्या होत्या. पण 2.07 कोटी रुपयांच्या सदर निविदांना आर्थिक मंजुरी देण्यास विलंब झाल्याने हे काम रखडले. यासंदर्भात 16 डिसेंबर, 2019 रोजी सरदेसाई यांनी राज्यपाल मलिक यांना पत्र लिहून लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे नजरेस आणून दिले होते. राज्यपालांनी त्यानंतर सदर मैदानाला भेट देऊन सौंदर्यींकरणासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते
राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीची ज्योत पेटविली म्हणून गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. असे असताना ज्या ठिकाणी ही ज्योत पेटविण्यात आली त्या लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी जेमतेम 2 कोटींची तरतूदही सरकार करू शकत नाही काय, असा सवाल यापूर्वीही गोवा फॉरवर्डने उपस्थित केला होता.