बार असोसिएशनची मुख्यमंत्र्यांच्या सचिवांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे वकिलांचे आर्थिक स्रोतही कमी झाले आहेत. त्यामुळे अनेक वकील अडचणीत आले आहेत. तेंव्हा वकिलांना बिनव्याजी किमान 5 लाख रुपये कर्ज द्या, अशी मागणी बार असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे सचिव शंकरगौडा पाटील यांच्याकडे करण्यात आली.
गेल्या साडेतीन महिन्यांपासून न्यायालयीन कामकाज बंद झाले आहे. त्यामुळे वकील बेरोजगार झाले आहेत. अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. तेंव्हा इतरांप्रमाणे सरकारने वकिलांनाही आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. सरकारने कर्नाटक बार असोसिएशनला 5 कोटींची मदत केली असली तरी ती संपूर्ण राज्यातील वकिलांच्या दृष्टिने अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे बिनव्याजी 5 लाख कर्ज द्या, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. शिवपुत्र फटकळ यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.