प्रतिनिधी / सातारा :
शाहुनगरातील फौजदारी गुन्ह्यांतील प्रतीथयश वकील ऍड. राम खारकर हे आपल्या कारमधून शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास निघाले असताना त्यांना अज्ञात दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणात सातारा शहर पोलिसांनी एकास तर शाहुपूरी पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी, मारहाणीत वापरलेला दगड हस्तगत केला असून आणखी काहीजणांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
सातारा न्यायालयात फौजदारी स्वरुपाचे खटले चालवणारे प्रतिथयश नामांकित असे वकील ऍड. राम खारकर यांच्यावर शनिवारी रात्री हल्ला झाला होता. त्या हल्याने शाहुनगरासह सातारा शहरात खळबळ उडाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक भगवान निंबाळकर यांना सुचना दिल्या होत्या. निंबाळकर यांनी स्वतः फिर्यादी असलेल्या वकीलांची पुणे येथे जावून माहिती घेतली. घटनास्थळीही चौकशी केली. पोलीस सर्व पद्धतीने मारेकऱ्यांचा शोध घेत होते. त्याच दरम्यान, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांना हल्लेखोराबाबत खास खबऱ्याबाबत माहिती मिळताच त्यांच्या पथकाने अलगद प्रतिक कांबळे याला उचलला. त्याने मारहाण केल्याची माहिती दिली. दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांची नावे त्याने पोलिसांना सांगितली. त्यावरुन शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आकाश देवानंद यास ताब्यात घेतले. आणखी त्यांच्या सोबत असलेल्यांचा शोध सुरु आहे.