प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच शहर व उपनगरात डेंग्यूची साथही वाढते आहे. रविवारी विष्णू गल्ली, वडगाव येथील एका बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.
वरद किरण पाटील (वय 12) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, आजी, मामा-मामी, आत्या, मावशी असा परिवार आहे. वरद सहावीचा विद्यार्थी होता. तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
आजारामुळे त्याला तीन दिवसांपूर्वी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारांचा उपयोग न होता रविवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. मजगाव पाठोपाठ आता वडगावातही डेंग्यूचा फैलाव झाल्याचे स्पष्ट होत आहे.
वडगावची मंगाईदेवी जत्रा मंगळवार दि. 14 रोजी होणार आहे. पंचमंडळी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही जत्रा साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय झाला आहे. तरीही कोरोना व डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जत्रेच्या काळात काळजी व खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
याबरोबरच शहर आणि उपनगरात भटकी कुत्री आणि डुकरांचा उपद्रवही वाढला आहे. साथीच्या आजारांचे वाहक असणारे हे प्राणी मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका बालकाचा गेल्या आठवडय़ात मृत्यू झाला आहे. या सर्व घटना लक्षात घेता या मोकाट कुत्री आणि डुकरांचा महानगरपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.