सप उमेदवार अन् दद्दूच्या पुत्राचे प्रतिपादन
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि दस्यूमधील दरोडेखोर ददुआचा पुत्र वीरसिंह पटेल यांचे वक्तव्य समोर आले आहे. माझे वडिल दरोडेखोर होते, यात माझी काय चूक? 2005 पासून मी लोकांच्या हितासाठी काम करतोय. समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास येथील आदिवासींना अनुसूचित जमातीत सामील करण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याचे वीरसिंह यांनी म्हटले आहे.
ज्या जातीला मध्यप्रदेशात अनुसूचित जमातीत वर्ग करण्यात आले आहे, त्याच जातीला उत्तरप्रदेशात अधिकारांपासून वंचित करण्यात आल्याचे ते म्हणाले. उत्तरप्रदेशच्या चित्रकूट, बुंदेलखंड क्षेत्रासह मध्यप्रदेशच्या विंध्य भागात शिवकुमार पटेल उर्फ ददुआने 3 दशकांपर्यंत स्वतःचे वर्चस्व निर्माण केले होते.
वीरसिंह यांना समाजवादी पक्षाने चित्रकूट जिल्हय़ातील मानिकपूर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी वीरसिंह यांनी येथून निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. वीरसिंह हे 2012 च्या निवडणुकीत सपच्या तिकिटावर विजयी होत आमदार झाले होते. परंतु 2017 च्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून पराभव पत्करावा लागला होता.
ददुआचा मृत्यू झाल्यावर आता 14 वर्षे लोटली आहेत, परंतु चित्रकूट आणि बांदा भागात आजही त्याच्या नावावरील राजकारण संपलेले नाही. ददुआ दरोडेखोर असला तरीही बुंदेलखंडच्या कुर्मी समाजावर त्याच्या प्रतिमेचा प्रभाव होता. हेच समीकरण पाहता सपने ददुआच्या पुत्राला उमदेवारी दिली आहे.