प्रतिनिधी / वडूज :
वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेले काही दिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली होती. रेकॉर्डवरील संसयितांची चौकशी केली जात होती परंतू पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने परिसरात मजूर म्हणून आलेल्या लोकांच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून त्याअनुषंगाने गस्त वाढवण्यात आली होती. दि.1 रोजी पहाटे अंबवडे (ता.खटाव) गावच्या हद्दीत गस्तीवरच्या पोलिसांना काही संशयितांची चाहूल लागली. पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
शाम उत्तम पवार, शिवानी ईश्वर भोसले (दोघे रा. पाचंद्री, ता.पारनेर), महादेव मोहन गरबडे, मोहन संपत गरबडे (दोघे रा. शिखरवाडी, ता.पाटोदा), चतुराबाई नारायण भोसले (रा.पारनेर, जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत वडूज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागील काही दिवसापासून वडूज परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने वडूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्यासह हवालदार दीपक देवकर, अश्विनी घार्गे, दऱ्याबा नरळे, संदीप शेडगे,आण्णाराव मारेकर हे दि.1 रोजी रात्री पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त घालत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अंबवडे (ता.खटाव) गावाच्या हद्दीत डॅम फाटा नावाच्या शिवारात पाच पुरुष व चार महिला दोन दुचाकीवरून रस्त्याकडेला थांबल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे वाहन फिरवले असता, त्यांनी पळ काढल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन संशयितांना पकडले तर दोन पुरुष व एक महिला अंधाराचा फायदा घेत, पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यातील संशयितांकडे चौकशी केली असता अंबवडे परिसरात दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. संशयितांकडून एक सुरा, एक चाकू, स्क्रू ड्राईव्हर, नट बोल्ट काढण्याचा पाना असे साहित्य जप्त केली. त्यानंतर त्यांना वडूज पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरोधात दोरडय़ाच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमोद दिक्षीत हे करीत आहेत.