शाहुवाडी / प्रतिनिधी
गेले पाच दिवस घराच्या छतावर आशाळभूत नजरेन बसलेल्या आणि अंगी असलेल्या वेदना सहन करणाऱ्या वानराला वन विभागाने जीवदान दिल आहे. तर गेल्या पाच दिवसांपासून त्याच्या पोटाला खाऊ घालाण्याबरोबरच त्याच्यावर उपचार करण्यासाठी धडपड करणारे मलकापूर येथील व्यापारी अजय शेटे, मधूकर कोरे यांनीही चार-पाच दिवस त्यावानराची विशेष काळजी घेतली होती.
मलकापूर ता. शाहुवाडी येथील सदगुरू किराणा स्टोअर्सचे मालक अजय शेटे यांच्या घराच्या छ्तावर एक वानर बसलेले होते. दोन दिवस झाले तरी देखील वानर जागा सोडत नव्हते. चेहऱ्यावर वेदनेची किनार, मदतीसाठी धडपणारी नजर आणि मुक्या भावना घेऊन बसलेल्या वानराची ही केविलवाणी अवस्था अजय शेटे आणि मित्र परीवाराला बेचैन करत होती.
त्यांनी तातडीने ही बाब वनविभागाला कळविताच वनविभागाचे राजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव पवार, तुकाराम थोरवे यांनी त्या वानराला ताब्यात घेऊन उपचारासाठी नेले आणि पाच दिवस बोचरी थंडी आणि मुक्या वेदना सहन करत असलेल्या वानराला उपचारा सोबतच माणूसकीतला जिव्हाळाही मिळाला.