पुरुष संघात मात्र एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही, पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना स्थान
दुबई / वृत्तसंस्था
स्टार भारतीय सलामीवीर स्मृती मानधना हिची 2021 मधील सर्वोत्तम आयसीसी टी-20 महिला संघात वर्णी लागली. पण, आश्चर्य म्हणजे पुरुष गटातील सर्वोत्तम संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान लाभू शकले नाही. महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे उपकर्णधारपद भूषवत असणाऱया स्मृतीने 2021 मध्ये या क्रिकेट प्रकारात भारतीय संघातर्फे सर्वोच्च 255 धावा फटकावल्या. यादरम्यान तिची सरासरी 31.87 इतकी राहिली.
25 वर्षीय स्मृतीने 9 सामन्यात 2 अर्धशतके झळकावली. शिवाय, नियमितपणे फ्लाईंग स्टार्ट मिळवून देण्यात यशस्वी ठरली. तिचा स्ट्राईक रेटही 131.44 इतका लक्षवेधी राहिला. वर्षातील सर्वोत्तम टी-20 महिला संघात स्थान लाभणारी स्मृती एकमेव भारतीय खेळाडू असून या संघात अनेक ब्रिटीश खेळाडूंचा समावेश आहे. नॅट स्क्रीव्हरकडे या संघाचे नेतृत्व आहे.
वर्षभराच्या कालावधीत अनेक अनुभवी, इंग्लिश अष्टपैलू खेळाडूंनी आपला वरचष्मा गाजवला. त्यापैकी, स्कीव्हरने मध्यफळीत फलंदाजी करताना एका अर्धशतकासह 153 धावांचे योगदान दिले. याशिवाय, तिने 20.20 च्या सरासरीने 10 बळीही घेतले. स्मृती मानधनाप्रमाणे टॅमी ब्यूमाऊंटने देखील लक्षवेधी योगदान दिले. 30 वर्षीय ब्यूमाऊंटने 9 सामन्यात 33.66 च्या सरासरीने 303 धावा फटकावल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश राहिला. डॅनी व्याट, यष्टीरक्षक ऍमी जोन्स व फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन या इंग्लिश खेळाडूंचाही या सर्वोत्तम संघात समावेश राहिला. आयर्लंडची गॅबी लुईस, दक्षिण आफ्रिकन त्रिकुट लॉरा व्होल्वार्ड, शबनीम इस्माईल व मॅरिझेन कॅप्प, झिम्बाब्वेची लोरिन फिली यांना देखील या संघात स्थान मिळाले आहे.
पुरुष संघात बाबर आझमसह 3 पाक खेळाडूंचा समावेश
2021 मधील कामगिरीच्या आधारावर घोषित केल्या गेलेल्या पुरुष गटातील संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. कर्णधार बाबर आझम, सलामीवीर मोहम्मद रिझवान व शाहीन आफ्रिदी असे तिघे पाकिस्तानी खेळाडू या संघात समाविष्ट आहेत. या तिन्ही खेळाडूंनी आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा गाजवली होती.
ऑस्ट्रेलियाला पहिलावहिला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे अष्टपैलू मिशेल मार्श व जलद गोलंदाज जोश हॅझलवूड या संघात समाविष्ट आहेत. याशिवाय, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर व तबरेझ शमसी या आफ्रिकन त्रिकुटाची यात वर्णी लागली आहे. इंग्लिश संघातून फक्त यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरला या सर्वोत्तम टी-20 संघात स्थान लाभले.
आयसीसीचे वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघ
पुरुष गट ः जोस बटलर (इंग्लंड), मोहम्मद रिझवान (पाकिस्तान), बाबर आझम-कर्णधार (पाकिस्तान), एडन मॅरक्रम (द. आफ्रिका), मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया), डेव्हिड मिलर (द. आफ्रिका), तबरेझ शमसी (द. आफ्रिका), जोश हॅझलवूड (ऑस्ट्रेलिया), वणिंदू हसरंगा (श्रीलंका), मुस्तफिजूर रहमान (बांगलादेश), शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान).
महिला गट ः स्मृती मानधना (भारत), टॅमी ब्यूमाऊंट (इंग्लंड), डॅनी व्याट (इंग्लंड), गॅबी लुईस (आयर्लंड), नॅट स्कीव्हर-कर्णधार (इंग्लंड), ऍमी जोन्स (इंग्लंड), लॉरा वोल्वार्ड (द. आफ्रिका), मरिझेन कॅप्प (द. आफ्रिका), सोफी इक्लेस्टोन (इंग्लंड), लोरिन फिरी (झिम्बाब्वे), शबनीम इस्माईल (द. आफ्रिका).