प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथील शेतजमिनीमध्ये बुडाची वसाहत योजना राबविण्यास शेतकऱयांनी विरोध दर्शविला आहे. वसाहत निर्माण करण्यास पिकावू शेतजमीन देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱयांनी बुडा कार्यालयात आमदारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेतली. त्यामुळे शेतकऱयांची समजूत काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलणी फिसकटली.
बुडाच्या सर्वसाधारण बैठकीवेळी कणबर्गी येथील शेतकऱयांनी आंदोलन छेडले होते. न्यायालयात वाद सुरू असताना योजना राबविण्यात येऊ नये, अशी भूमिका व्यक्त केली होती. आमच्या पिकावू जमिनी वसाहत निर्माण करण्यास देणार नाही. त्यामुळे आमच्या जमिनी योजनेच्या आराखडय़ातून वगळण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी बुडा कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, आमदार अनिल बेनके आणि बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांच्या उपस्थितीत कणबर्गी येथील शेतकऱयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदारांनी शेतकऱयांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केला. या जागेच्या मोबदल्यात अन्यत्र जागा देऊ, असे सांगितले. पण शेतकऱयांनी याला आक्षेप घेऊन नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणाऱया जागेत वसाहत योजना राबवावी, असे मत व्यक्त केले. विकसित केलेल्या जागेपैकी 50 टक्के भूखंड शेतकऱयांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी योजना राबविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनी केले. पण शेतकऱयांनी ही योजना आम्हाला मान्य नाही. कोणत्याही प्रकारची वसाहत योजना राबविण्यासाठी आमच्या जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
यावेळी शेतकऱयांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण शेतकऱयांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगून योजनेमधून न्यायप्रविष्ट जमिनी वगळण्यात याव्यात, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालय जो निकाल देईल तो बुडाला मान्य असेल, असे सांगून बैठक आटोपती घेण्यात आली. शेतकऱयांना भूखंड देण्याचे आमिष दाखवून संमती घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलणी फिसकटली.
यावेळी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या शेतकऱयांना मात्र बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुभा देण्यात आली. त्यामुळे अन्य शेतकऱयांची निराशा झाली. याप्रसंगी भू-संपादनास विरोध करण्यासाठी कणबर्गी परिसरातील शेतकरी आणि रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.