वार्ताहर/ भुईंज
पत्नीसह प्रेयसीचा खून करणाऱया क्रूरकर्मा नितीन गोळेचे कारनामे आणखी काही आहेत का? यादृष्टीने भुईज पोलिसांची डीबी टीम काम करत असून त्याकामी आरोपी नितीन गोळे याला व्याहळीसह आसले, मांढरदेव आदी ठिकाणी घेऊन जाऊन सखोल चौकशी केली. तसेच वाई पोलीस स्टेशनला त्यानेच दाखल केलेल्या नातेसंबंधातील मिसींगबाबत अधिक चौकशी केली असता ती व्यक्ती हयात असल्याचे तपासात समोर आले आहे. तरीही तालुक्यातील अन्य मिसींग तक्रारींच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. कारी (ता. सातारा) येथील संध्या शिंदे हिच्या खूनप्रकरणी तपास करताना नितीन गोळेने पत्नीचाही खून केल्याचे कबूल केल्याने तसेच खून करण्याची पद्धत संतोष पोळने केलेल्या हत्याकांडाप्रमाणेच असल्याने नितीन गोळेसंदर्भात आणखी काही घटना आहेत का याची चाचपणी पोलीस करत आहेत. याच हेतूने मिसींग तक्रारीची चौकशी केली जात आहे. तसेच त्याने ज्या ज्या ठिकाणी हे प्रकार केले आहेत त्या त्या ठिकाणी आरोपी नितीन गोळेला पोलिसांनी फिरवले. तेथून काही अधिक माहिती मिळतेय का हे पाहिले. मांढरदेव परिसरात पाऊस आणि धुक्यामुळे तपासकार्यात अडचणी आल्या, अशी माहिती भुईंजचे तपास अधिकारी आशिष कांबळे यांनी दिली.