सातारा / प्रतिनिधी :
‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरं कोण म्हणतयं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे; नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चा वाई तालुका यांच्यावतीने वाई प्रांत कार्यालयाच्या परिसरात बुधवारी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आाहे, गेली अनेक वर्ष मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलने, निवेदने मोर्चे आदी लोकशाही मार्गाने प्रयत्न केले आहेत. मात्र, आजपर्यंत मागण्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. मराठा समाजातील अनेक तरुण मुले, मुली पात्रता असूनदेखील केवळ आरक्षणा अभावी शिक्षण व नोकरीपासून वंचित राहीली आहेत. आजपासून कोल्हापूर येथे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरु झाले आहे. त्या आंदोलनास वाई तालुक्याच्यावतीने पाठींबा देण्यात येत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करुन मान्य कराव्यात, अन्यथा तीव आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
त्यानंतर वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. या आंदोलनामध्ये चरण गायकवाड, काशिनाथ शेलार, प्रदीप कदम, किरण खामकर, स्वप्नील भिलारे, यशपाल भोसले, निलेश शिंदे, सागर जाधव, सचिन घाडगे, गजानन भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.