प्रतिनिधी / वाकरे
वाकरे ता. करवीर येथील गाव तलाव उत्खननात बुधवारी १८८९ सालातील एक नाणे आणि १९४० च्या दरम्यानची अनेक नाणी सापडली. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा नजरेसमोर येत आहे.
वाकरे गाव तलावाचे गेले दिड महिना उत्खनन सुरू आहे.या उत्खननात अनेक ऐतिहासिक गोष्टीचा उलगडा होत आहे. या तलावाच्या चारी बाजूला चिरा दगडात बांधकाम केलेला सुरेख घाट असून या घाटाचे बांधकाम भरभक्कम आहे. या तलावात अनेक गोष्टी सापडत आहेत. यापूर्वी तलावात १९४४ च्या दरम्यानची काही ब्रिटिशकालीन नाणी सापडली आहेत. आज उत्खनन सुरू असताना १८८९ सालातील वन क्वार्टर आना हे नाणे सापडले. त्याचबरोबर १९४४ च्या दरम्यानची ब्रिटिश किंग जॉर्ज सहावा यांच्या कालखंडातील नाणी सापडली. तसेच जुन्या काळातील तुटलेले मातीचे हांडे सापडले आहेत.
करंगळीच्या आकारातील फुटलेल्या बांगड्या आज उत्खननात सापडल्या आहेत. त्यामुळे जुन्या काळातील महिला वापरत असलेल्या जाडजूड बांगड्यांचा एक वेगळा ठेवा समोर आला आहे. या उत्खननामुळे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा होत आहे. कोल्हापूर परिसरातील १२४९ ते १३२० या दरम्यानच्या सिंघणदेव यादव यांच्या काळातील हा सर्व वारसा असल्याचे पुराण शास्त्र अभ्यासक उमाकांत रानिंग यांनी सांगितले. त्यामुळे अजून काही गोष्टींचा उलगडा होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे.