‘रात्रीच्या राजकारणावरून’ महिलांचा ठिय्या : माजी आमदाराविरोधात संताप
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासंबंधी माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. या मुद्दय़ावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत चांगलेच जुंपले आहे. केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत.
संजय पाटील यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांनी तर संपूर्ण राज्यात या वक्तव्याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. सोशल मीडियावरही टीका होत आहे. रात्रीच्या राजकारणामुळे लक्ष्मी हेब्बाळकर आमदार झाल्या, असे वक्तव्य संजय पाटील यांनी केले होते. काँग्रेसच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी भाजपविरुद्ध टीकेची झोड उठविली आहे.
दरम्यान शुक्रवारी येथील गोमटेश विद्यापीठासमोर महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. एका महिलेसंबंधी बोलताना भान ठेवून बोलावे. संजय पाटील यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन त्वरित माफी मागावी, अशी मागणी धरणे धरणाऱया महिलांनी केली. कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेसनेही बेंगळूर येथे आंदोलन केले आहे.
…तुम्हीच आत्मपरीक्षण करा
संजय पाटील यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते महिलांचा किती गौरव करतात, हे लक्षात येते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा परिचयच दिला आहे, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे. तर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दादा तुम्हालाही बायको, मुलगी, आई-बहीण आहेत. तुम्ही जे बोललाय ते मला बोलला नाही. कोणाला बोललाय तुम्हीच आत्मपरीक्षण करा, असा सल्ला दिला आहे.