गेलची 99 धावांची खेळी निष्फळ, टी-20 मध्ये 1 हजार षटकारांचा विक्रम
वृत्तसंस्था/ अबु धाबी
ख्रिस गेलच्या 63 चेंडूतील 99 धावांच्या वादळी खेळीनंतरही राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्स इलेव्हनला एकतर्फी धूळ चारत सनसनाटी विजयाची नोंद केली. प्रारंभी, पंजाबने 4 बाद 185 धावांचा डोंगर रचला. पण, प्रत्युत्तरात राजस्थाननेही धमाकेदार फलंदाजी साकारत डावातील 18 व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानने 17.3 षटकातच 3 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
186 धावांचे कठीण आव्हान असताना राजस्थानतर्फे बेन स्टोक्स (26 चेंडूत 50), संजू सॅमसन (25 चेंडूत 48), स्टीव्ह स्मिथ (20 चेंडूत नाबाद 31), जोस बटलर (11 चेंडूत नाबाद 22) यांनी सांघिक खेळ साकारत विजय खेचून आणला. शेवटच्या 4 षटकात 30 धावांची गरज असताना शमीच्या गोलंदाजीवर 19 धावा लुटल्या गेल्या आणि इथेच हा सामना राजस्थानच्या बाजूने झुकला.
ख्रिस गेलचे 1 हजार षटकार!
तत्पूर्वी, धडाकेबाज, डावखुरा फलंदाज ख्रिस गेलच्या 99 धावांच्या झंझावाती खेळीच्या बळावर किंग्स इलेव्हन पंजाबने 5 बाद 185 धावांचा डोंगर रचला. ख्रिस गेलचे शतक अवघ्या एका धावेने हुकले असले तरी त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळेच पंजाबला दोनशे धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. गेलने येथे टी-20 क्रिकेटमध्ये 1 हजार षटकारांचा नवा विक्रम रचला. सध्या त्याच्या खात्यावर 1001 षटकार आहेत. गेलशिवाय, कर्णधार केएल राहुलने 46 धावा फटकावल्या, ते ही पंजाबच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. राजस्थान रॉयल्सतर्फे बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.
या हंगामातील पहिल्या टप्प्यात अनेक सामन्यात खेळू न शकलेल्या ख्रिस गेलने मागील काही लढतीत सातत्यपूर्ण फटकेबाजीत कमालीचे सातत्य राखले आहे आणि राजस्थानविरुद्धचा सामना देखील याला अपवाद ठरला नाही. गेलने संधी मिळेल त्या चेंडूवर फटकेबाजी करत आपल्याला ‘युनिव्हर्सल बॉस’ असे का संबोधले जाते, याचा तंतोतंत प्रत्यय आणून
दिला.
गेलने राजस्थानच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्याचा सिलसिला कायम राखला आणि अगदी शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत होईतोवर तो कायम राहिला होता.
जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने लेग स्टम्पवर बिनचूक टाकलेल्या यॉर्करवर गेलचे टायमिंग चुकले आणि त्याला 99 धावांवर त्रिफळाचीत होत परतावे लागले. बाद होऊन परतत असताना येथेही त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत बॅट हँडलवर हेल्मेट अडकवून ते उंचावत तंबूचा रस्ता धरला.
याशिवाय, निकोलस पूरनने 10 चेंडूत 3 षटकारांसह 22 धावा वसूल केल्या तर मॅक्सवेल व हुडा अनुक्रमे 6 व 1 धावावर नाबाद राहिले. गोलंदाजीत राजस्थानतर्फे जोफ्रा आर्चरने 26 धावात 2 तर बेन स्टोक्सने 32 धावात 2 बळी घेतले.
राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. मनदीप सिंग पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने पंजाबची खराब सुरुवात झाली. स्टोक्सचा अप्रतिम झेल डोळय़ाचे पारणे फेडणारा ठरला. वास्तविक, आर्चरच्या बाऊन्सरवर मनदीपने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, यात तो चेंडू खाली ठेवू शकला
नव्हता.
आणि स्टोक्सने फुल लेंग्थ डाईव्ह लगावत अप्रतिम झेल पूर्ण केला. मनदीप त्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने पंजाबसाठी हा मोठा धक्का होता. पण, कर्णधार केएल राहुल व ख्रिस गेल यांनी त्यानंतर दुसऱया गडय़ासाठी 120 धावांची भागीदारी साकारत पंजाबला सुस्थितीत आणण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. या जोडीने 13.4 षटकातच शतकी भागीदारी साकारली.
कर्णधार केएल राहुल दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी पंजाबने 14.4 षटकात 2 बाद 121 धावांपर्यंत मजल मारली होती. केएल राहुलने स्टोक्सच्या स्लोअर वन चेंडूवर डीप मिडविकेटवरील तेवातियाकडे झेल दिला. त्याचे अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकले. मात्र, तोवर त्याने संघाला सुस्थितीत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. येथील लढतीत केएल राहुलने 41 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 46 धावांचे योगदान दिले. केएल राहुल बाद झाल्यानंतर ख्रिस गेलकडून अधिक अपेक्षा होत्या आणि त्यानेही या अपेक्षांना खरे उतरत फटकेबाजीचा ओघ कायम राखला.