प्रतिनिधी / सातारा :
सध्या एसटी बसेस बंद आहेत. कॉलेजवर परीक्षेच्या वेळेवर पोहचता येत नाही. ऑनलाईन शिकवणी झाली असताना दोन दिवसापूर्वी कॉलेज प्रशासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत येथील स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. परीक्षा या ऑनलाईनच घेण्यात याव्यात अशी मागणी केली. यामुळे कॉलेजच्या गेटवर काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. पोलीस प्रशासनाने विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासन यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली.
स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या बाहेर शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. अचानक आंदोलन सुरु केल्यामुळे कॉलेज प्रशासनासह पोलीस प्रशासनाचीही तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली. यावेळी बोलताना विद्यार्थी म्हणाले, आम्हाला ऑफलाईन आता का नको तर घरापासून कॉलेजपर्यत येण्याकरता बसेस नाहीत. एसटी बसेस बंद असल्याने खासगी वाहने भरतील तेव्हा ती हलवली जातात. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास वेळ होत आहे. आणि पैसेही जास्त जात आहेत. पाच ला कॉलेज सुटले तर घरी पोहचण्याकरता सात ते आठ वाजत आहेत. जाण्यायेण्यातच वेळ जातो. कधी अभ्यास करणार?, ऑनलाईनमध्ये स्पीडमध्ये शिकवले की ऑफलाईन पेपर कसा देणार, वेळ तरी जास्त हवा होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी परीक्षेची नोटीस दिली गेली आहे. अचानक नोटीस दिल्यामुळे कसा अभ्यास करणार असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. यामुळे स्व. यशंवराव चव्हाण कॉलेजबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.